” कन्या वाचवा समाज जगवा”!! कालपरवाच लज्जा हा चित्रपट पाहण्यात आला चित्रपट पाहताना एक स्त्री म्हणून असेल कदाचित पण अस्वस्थता, चिडचिड ,अगतिकता या सर्व गोष्टींनी डोळे परत परत भरून येत होते. चित्रपट संपला की आतून खूप खूप दमल्यासारखे वाटायला लागत. त्या चित्रपटात मुलगी जन्माला आल्याबरोबर तिला मृत्युपंथाला लावायची तयारी सुरू होते .बाल हत्येचे पाप लागू नये म्हणून तिला दुधात बुडवून मारण्याचा दांभिकपणाही त्यात दाखवलेला आहे. चित्रपटात समाजात असणाऱ्या गोष्टीचे प्रतिबिंब दाखवले जाते.

आज आपण जरी एकविसाव्या शतकाच्या, ग्लोबलायझेशनच्या गप्पा मारत असलो तरीही आपल्याकडच्या खेड्यापाड्यात मुलगी घरी जन्माला येणे हा अभिशाप समजला जातो. अशिक्षित, अडाणी लोक क्रूर पद्धतीने मुलींना मारतात असे म्हणताना जरी आपल्या पांढरपेशा मनावर ओरखडा उमटत असला तरी आपणही साळसूदपणे गर्भजलचिकित्सा करण्याला तीव्र विरोध तरी कुठे करतो? स्त्रीभ्रूणहत्या हा कायद्याने गुन्हा आहे पण ज्या समाजात स्त्रीला आदिशक्ती, आदिमाया म्हणून पूजले जाते त्या समाजात मुळात हा कायदा करावा लागणं हेच मुळी समाजाच्या दुर्दैवाचा कडेलोट आह. कुठल्याही आईला स्वतःचे मुलं मुलगा असो की मुलगी याचा काहीच फरक पडत नाही. परंतु आपल्या समाजात आजही मुलगा असणं ही गौरवाची बाब समजली जाते. आता असलेल्या समाज मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टीने म्हणावा तसा सुरक्षित नाही, पण समाज तुमच्या आमच्यानीच बनतो ना? पहिली मुलगी झाली की कितीही नाही म्हटलं तरी त्या आईच्या मनात मुलगा होण्याची आस असते कारण तो होणारा मुलगा तिला समाजात मानसन्मान आदर मिळवून देणारा असतो. परंतु मुलापेक्षा आई-वडिलांच्या भावना मुलीच जास्त चांगल्या रीतीने समजावून घेऊ शकतात. आईच्या पोटातून जन्म घेताना ती मुलगी सृजनशीलतेची स्वतःची क्षमता घेऊन जन्माला आलेली असते .”हृदयी पान्हा नयनी पाणी जन्मोजन्मीची कहाणी” ही प्रत्येक तिची कहाणी असते. आपल्याकडे स्त्रियांना एक तर आदिमाया, आदिशक्ती मानून तिची पूजा केली जाते किंवा एखादी भोग्य वस्तू समजून तिच्या ही परस्पर तिचा व्यवहार केला जातो.कधी द्रौपदी बनून स्वतःच्याच पतीकडून तीद्यूतात हरली जाते, तर कधी सीता बनून रावणाच्या हातून सहीसलामत सुटून रामाच्या संशयाच्या अग्निकुंडात परीक्षा देते .कधी गांधारी बनवून धृतराष्ट्र सोबत उभा जन्म देवाने मानवाला दिलेल्या सर्वात सुंदर उपहाराचा म्हणजे डोळ्यांचा सर्वस्वी अव्हेर करून त्याची सेवा करत काढते. असे कितीतरी उदाहरणे देता येतील जे परत परत ओरडून हेच सांगताहेत की नको आहे आम्हाला देव पण !देवाने दिलेले आयुष्य एक माणूस म्हणून मलाही जगू द्या. मला फक्त शरीरच नाही आहे तर मनही आहे. जरी मी शरीराने अबला असले तरी मनाने मी अनुरेणूहूनही सूक्ष्म व आभाळा होऊनही मोठी आहे. कल्पना करा की उद्या समाजात जर स्त्रियाच नसतील तर अशा समाजाची स्थिती काय होईल. सर्वात पहिले जर याच गतीने स्त्रीभ्रूणहत्या व्हायला लागली तर मनुष्यप्राण्याच्या वाढीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल .सर्वांना फक्त मुलगा हवा तर मग पुढे त्या मुलाचं भवितव्य काय असेल? याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मुलगा असो की मुलगी जन्माला आल्यानंतर दोघेही निरागस असतात .त्यांना मी मुलगा म्हणून माझ्यात काहीतरी विशेष आहे किंवा मी मुलगी आहे म्हणून माझ्यात काही कमी आहे याची जरासुद्धा कल्पना नसते. आपण मोठी माणसंच त्यांच्या मनात हे भरवत असतो.ओशो म्हणतात की मुलांना मोठे होईपर्यंत त्यांना त्यांचा धर्म सांगुच नये. कळू लागल्या नंतर त्यांचे त्यांनाच ठरवू द्यावं की ज्यांना कोणते ज्ञान पटतं, रूचतं .त्याप्रमाणेच आपण मुलांना लिंग श्रेष्ठत्व सांगू नये. म्हणजे निर्माण होणारी पुढची पिढी ही नितांतसुंदर , सुदृढ आणि निर्मळ समाजाचे रूप धारण करेल .कन्या ह्या समाजाला लाभलेले वरदान आहे. मुली जगल्या तर समाजाचं काही भवितव्य आहे ,कारण स्त्री व पुरुष अनादिकालापासून समाजाचे आधारस्तंभ आहेत. दोन्ही आधारस्तंभ तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे स्वतःच्या करंटेपणाने आपण स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड का म्हणून मारून घ्यायची ?मुली ह्या प्रत्येक आईवडिलांच्या मनातील हळवा कोपरा असतात .आपल्या मुलीवर प्रत्येक आईच प्रेम असतं, म्हणून तर आई आपल्या मुलीला म्हणते “तुला माहेर मिळावं म्हणून मी सासरी आले !!!त्यामुळे मुलींना वाचवणं ही आपल्या समाजाची नैतिक जबाबदारी आहे . समाजात मुलींचे असे स्थान निर्माण झाले पाहिजे की कुठल्याही मुलीच्या मनात कधीच येऊ नये “अगले जनम मोहे बिटिया ना किजो!!!!!

लेखिका :- कल्पना उबाळे

Kalpana Ubale
Author: Kalpana Ubale

Kalpana

Click to rate this post!
[Total: 1 Average: 2]
Share Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *