तू मूर्त प्रेमाची,तू नाजूका, तू मृदुला …….. तू देवी, इत्यादि इत्यादि विशेषणे देत ह्या देशातील संस्कृतीत स्त्रियांना कायम वरील रुपात रहायची व लोकांना पहायची सवय झालीये. काही स्त्रियाही भूषण मानतात. अन्याय होत असला तरी सहन करतात.

पण सख्यांनो हे पूर्णतः खरे नव्हते, नाही आणि नसणार आहे. स्त्री शांत रुपात दुर्गा असली तरी ती रौद्र रुपात काली आहे हे कुणीही विसरून चालणार नाही. या श्रृंखलेत आपण अशाच एका कर्तृत्ववान स्त्रीचे कालिकेचे स्मरण करुया. सख्यांनो, ह्या इतिहासातील सत्य घटना असतील. फक्त क्रमाने नसतील मला जशा त्या उपलब्ध होतील तशा मी मांडेन.

-प्रथम पुष्प

किरण देवी :-  राजस्थानच्या बिकानेरचा राजा पृथ्वीराजची पत्नी, रुपसुंदरी होती. ही महाराणा प्रतापसिंहांची पुतणी- महाराज शक्तिसिंह यांची मुलगी.

कालावधी होता अर्थातच मुगल शासनाचा. अकबर दरवर्षी नौरोज मेळा दिल्लीत भरवत असे. या मेळ्यात फक्त स्त्रियांनाच प्रवेश असे. स्वतः अकबर स्त्री वेष घेऊन मेळा बघायला जात असे. जी स्त्री त्याच्या मनात भरे तिला दासी भूलथापा देत, अकबराच्या जनानखान्यात नेऊन सोडत.

या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ बिकानेरची राणी किरण देवी, मूर्तिमंत सौंदर्य उत्सुकतेने नौरोज मेळा बघायला गेली………….सर्व महिलांचा मेळा…………. दुर्दैवाने ती अकबराच्या नजरेत भरली. तिला अकबराच्या जनानखान्यात नेण्यात आले.अकबराने महालात पाय ठेवताच सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. अकबर जवळ येताच तिने अकबराला जमिनीवर आदळले, कट्यार काढून त्याच्या छातीवर पाय रोवून उभी राहिली. गळ्याला तलवार लावली आणि गर्जली, “नराधमा तुला माहितेय ना मी महाराणा प्रतापसिंहांची पुतणी आहे………… ज्यांच्या नावाचे स्मरण होताच तुझी झोप तुझ्यापासून दूर जाते. तुझी शेवटची इच्छा सांग.” …………. अकबर गर्भगळीत झाला. त्याने कधीच विचार केला नसेल, एका सम्राटाला एका राजपूत स्त्रीच्या पायाशी प्राणांची भीक मागावी लागेल.

अकबराने गयावया करत तिची माफी मागितली. किरणदेवीने नौरोज मेळा बंद करण्याच्या अटीवर त्याला माफ करून जीवनदान दिले. त्याच्याकडून कबूल करुन घेतले ह्यापुढे कुठल्याही स्त्रीला तो त्रास देणार नाही.

ह्या घटनेचे वर्णन गिरिधर आसिया द्वारा रचित “सगत रास” मध्ये पृष्ठ 632 वर केले आहे. (पेंटिंग १)बिकानेर संग्रहालयातील पेंटिंग मध्ये ही घटना

किरण सिंहणी ही चढी

ऊपर खींच कट्यार………!

भीख मांगता प्रयाण की

अकबर हाथ पसार………!!

तर (पेंटिंग २)

अकबराच्या गळ्याला तलवार लावून त्याच्या छातीवर पाय रोवून उभ्या असलेल्या किरण देवींचे चित्र जयपूरच्या संग्रहालयात आज ही सुरक्षित आहे.

अशा या तेजस्वी तारकेस शतशः नमन.

अश्या तेजस्वी स्त्रिया आपल्या देशात होत्या आणि आहेत. हा वारसा आपल्या  परीने आपण जपूया हीच त्यांना दिलेली आदरांजली.

– शालन सप्रे

Shalan Sapre
Author: Shalan Sapre

Click to rate this post!
[Total: 1 Average: 4]
Share Post

2 Comments

  1. Sapre madam khuup chhan veer gatha vachayla milali…..kiran devi.

  2. Khup chan aani pternadayak lekh shalan madam

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *