अशी शाळा
तुझ्यासाठी माझ्या बाळा,
घडवेन मी अशी शाळा ,
नसेल फक्त निर्जिव फळा
असेल वात्सल्य अन् लळा ,
नसेल तुझ्या तोंडावर बोट ,
अन् हाताची घडी ,
खुर्ची पालक शिक्षक
अन् टेबलावर छडी ,
असतील तूच बनवलेली ,
उदाहरणे अन् समीकरणे ,
अन् वापरासाठी भुकेली ,
नाना परीची उपकरणे ,
आठवले नाही म्हणून
होणार नाही शिक्षा ,
केवळ पोपटपंची वरुन
होणार नाही परीक्षा
असेल मोकळा श्वास ,
परस्परांवर विश्वास ,
तुझेच प्रयोग तुझाच अभ्यास ,
तुझे मत असेल खास ,
शिक्षक असेल शेतकरी
नसेल शिकवणे रुक्ष
पेरणे,रुजवणे,उगवणे,
फुलणे यात असेल दक्ष
तेथे असेल परस्परांना
समजणे अन् समजावणे
आनंदाचे देणे घेणे
तुझे पूर्णत्वाने उमलणे !!

अंजली नवलकर

Anjali Navalkar
Author: Anjali Navalkar

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]
Share Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *