swayamprerit.in

सोलो ट्रॅव्हलर

नाव – ज्योती त्रिपाठी
वय – २९
गाव – पुणे
काम- आयटी इंजिनिअर

नागालँड म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येतात ते आदिवासी, घनदाट जंगल, विशिष्ट प्रकारची खाद्यसंस्कृती. आणि मेघालय म्हटले की अर्थातच, मुसळधार पाऊस, झाडाच्या मुळांचे पूल, वगैरे. सहसा आपण नागालँडमधील निवडक व प्रसिद्ध ठिकाणे, विशिष्ट ‘फेस्टिव्हलस’ला भेट देणे पसंत करतो. पण एकट्या मुलीने नागालँड व मेघालयासारख्या भागात एकटीने जाणे तसे नक्कीच विशेष.

ज्योतीला नेहमीच एकट्याने प्रवास करायला आवडते, मग ते अगदी नागालँड असले तरीही. एकटीच्या प्रवासाचे संपूर्ण नियोजन स्वतःच्या जबाबदारीवर करण्याची आव्हानात्मक बाब तिला आवडते. ग्रुपसोबत प्रवास करताना आपण नित्याच्याच गोष्टींमध्ये अडकतो आणि त्या ठिकाणच्या नवीन गोष्टींचा आस्वाद घेणे राहून जाते. जसे की, स्थानिक लोकांना भेटणे, त्यांची संस्कृती जाणून घेणे, स्थानिक भाषा शिकणे, वगैरे.

‘मी भारतातील जवळपास सर्व ठिकाणे पहिली होती. दक्षिणेकडील अंदमान-निकोबारपासून उत्तरेकडील लेह-लडाख, पश्चिमेकडील कच्छचे वाळवंट. पण असे असूनही ईशान्येकडील राज्यांत म्हणजेच मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय, नागालँड, आसाम, अरुणाचल प्रदेश येथे जाण्याची मनीषा सतत बारगळत होती. संधी मिळताच मी क्षणाचाही विलंब न करता माझ्या पहिल्या सोलो ट्रीपचे संपूर्ण नियोजन केले आणि माझ्या पहिल्या सोलो ट्रीपचा मनमुराद आनंदही लुटला.’ ज्योती तिचा प्रवासपट उलगडत होती. पण याचबरोबर या प्रवासापलीकडेही तिने केलेला ‘तिचा   स्वतःसोबतचा’ प्रवास मला जाणवत होता.

‘एकटीने प्रवास करत असताना तुम्ही पूर्णपणे तुमच्यासोबत असता. स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय याची अनुभूती घेता येते. शिवाय प्रवासात काहीवेळा आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्याची वेळ येते, त्या वेळी एकटीने आणि खंबीरपणे त्यांना तोंड द्यावे लागते. आणि या गोष्टी मला माझ्या रोजच्या जीवनात देखील खंबीरपणे उभे राहण्यास शिकवतात.’

ज्योतीने आजवर भारतासहित नेपाळ, श्रीलंका, दुबई, मादागास्कर, जॉर्डन, सेशेल्स या ठिकाणीही प्रवास केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, थोड्या मूलभूत सुरक्षेच्या गोष्टी पाळल्यास सर्वच ठिकाणे महिलांना प्रवासासाठी सुरक्षित आहेत. सर्व ठिकाणी लोक उत्तम सहकार्य करतात. महिलांकडे तर एक नैसर्गिक ‘सुपर पॉवर’ आहे, ज्यामुळे त्यांना धोक्याची सूचना आधीच कळते.

ज्योती आवर्जून सांगते, ‘चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवा, प्रवासाचे धाडस करा. जग खूप सुंदर आहे, गरज आहे ती मनात असलेल्या ‘किंतू’ला दूर करण्याची.’

Source : Click Here

admin1975
Author: admin1975

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]
Share Post