घरटे

भल्या पहाटे कसल्याशा आवाजाने जाग आली
दुर्मिळ झालेल्या चिमण्यांची
चिवचिव कानी पडली !!
हळूच बाहेर जाऊन
जेव्हां थोडी चाहूल घेतली
खिडकीला घरटं बांधण्याची
त्यांची तयारी होती चालली !!
किती किती छान वाटलं
वेड्या या मनाला
म्हंटलं मिळाला नवा शेजारी
शेवटी आमच्या घराला !!
माणसांचा शेजार हवाय कशाला ?
रोज रोज कटकट करणारा
नक्कीच चालेल चिमण्यांचा
निदान वेगळी भाषा बोलणारा !!
चिमणा आणून देत होता
चोचीने एकेक काडी
चिमणीला मात्र बांधायची होती
बहुतेक माडीवर माडी !!
कॉलम म्हणून उभ्या होत्या
खिडकीच्या दोन बिजागरी
तेव्हां कळली स्थापत्यशास्त्रातली
त्यांची गरुडभरारी !!
बराच वेळ पाहण्यात गेला
प्रयास घरटे बांधण्याचा
वाटलं द्यावा आपण त्यांना
हात थोडा माणुसकीचा !!
पण खपली नाही लुडबुड माझी
चिमण्या भुर्र उडून गेल्या
माणुसकीच्या अनेक क्लृप्त्या
मुळीच नाही कामी आल्या !!
दोन दिवस शांत गेले
विरस झाला मनाचा
तिसऱ्या दिवशी कानी आला
आवाज जुन्या ओळखीचा !!
चिमण्या परत आल्याने
आनंदाचे भरते आले
जसे दूर गेलेले सोबती
पुन्हा घरटी परतले !!
खडसावून बजावले आता
स्वतःला अन् मनाला
त्रास अजिबात द्यायचा नाही
स्वच्छंदी त्या पाखरांना !!
हात धरुन घेतली शपथ
घरट्यापाशी जायचे नाही
जोडता नाही आलं तरी
दुसऱ्याचं घरटं मोडायचं नाही !!

अंजली नवलकर

Anjali Navalkar
Author: Anjali Navalkar

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]
Share Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *