रविवार,दि.१२/०१/२०२०, आम्हां काही स्वयंसिद्धांसाठी अत्यंत अविस्मरणीय ठरला. आज आमची सुनियोजित अशी ठाणे येथे औद्योगिक सहल होती. मिठाईचे पदार्थ बनविणाऱ्या कारखान्याला आपल्याला भेट द्यायची आहे एवढंच मेघना मॅडमनी आम्हांला सांगितलं होतं. ठरल्याप्रमाणे आराधी मॅडम, मेघना मॅडम, मानसी मॅडम आणि आम्ही सत्तावीस उद्योगिनी अशा एकूण तीस जणी सहलीच्या ठिकाणी जाण्यास मार्गस्थ झालो. एव्हाना सहलीचे ठिकाण तर आम्हाला कळले होते-- प्रशांत कॉर्नर. आता या प्रशांत कॉर्नर मध्ये आपल्याला काय पहायला मिळणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. आणि प्रशांत कॉर्नरचे ते भव्य प्रवेशद्वार आणि प्रशस्त इमारत पाहून तर उत्सुकता आणखीनच ताणली गेली. प्रवेशद्वारापाशीच असलेले श्री अन्नपूर्णा देवीचे भव्य तैलचित्र सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. आम्ही आत शिरताच रिसेप्शन काऊंटरवर असणाऱ्या श्री. सहस्रबुद्धे यांनी आमचे स्वागत केले. त्यांनी केलेल्या स्वागताचा स्वीकार करायचा की त्या काचेच्या दरवाज्यापलीकडे दिसत असलेल्या मिठाईच्या शॉपकडे पहायचं, या संभ्रमात आम्ही पडलो. आणि श्री. सहस्त्रबुद्धे यांनी तर क्षणाचाही विलंब न लावता आमच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली . महिलांनी उद्योगात का शिरायचं, आणि एकदा शिरल्यावर मागे वळुनही का पाहायचं नाही याबद्दल जणू काही मार्गदर्शनाचे भाष्य ते करू लागले. आमच्यापैकी प्रत्येकीच्याच मनात काही ना काही तरी प्रश्न उपस्थित होतच होता. आणि श्री. सहस्त्रबुद्धे सुद्धा समर्पक उत्तरे देत होते. श्री. सहस्त्रबुद्धे सांगत होते की साधारणपणे पाच महिलांनी एकत्र येऊन फूड कॉर्नर सुरू करावा. या फूड कॉर्नर वर आपण कोणकोणते पदार्थ ठेवू शकतो याची यादी करण्यापूर्वी आपल्या पाच जणींची आपण आपसांत चांगली ओळख करून घ्यावी. कोणकोणते पदार्थ बनविण्यात आपला हातखंडा आहे हे प्रत्येकीच्या नावापुढे लिहावे. आणि नंतरच यादी बनवावी. प्रत्येक महिलेच्या अंगी उपजतच असलेल्या निर्माण क्षमतेचा उपयोग करून एकमेकींना पदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेत तयार करावे. एकमेकींचा सन्मान करावा. वाद-विवाद जरी झाले तरी, एकमेकींना आदराने वागवण्याचे आपणच ठरविल्यामुळे त्या वादातूनही चांगलेच घडेल आणि व्यवसायवृद्धी होईल.' मी ' पणा सोडला तर सर्वांचाच पुढील प्रवास आनंददायी फायदेशीर होईल. आपल्या फूड कॉर्नर वर इनोव्हेटिव्ह कॉम्बिनेशन्स ठेवा. आजूबाजूच्या परिसरातील शाळा, कंपन्या, बँका, इतर संस्था या ठिकाणांना भेट देऊन आपल्या या फूड कॉर्नर ची माहिती द्यावी. कोणते पदार्थ बनवले जातात व ते बनवताना आपण कोणकोणते साहित्य वापरतो याबद्दलची माहिती द्यावी. पदार्थांमध्ये विविधता आणून, नेहमीच्याच पदार्थांबरोबर इतर काही खास पदार्थ बनवून गिर्‍हाईकाला आकर्षित करू शकतो आणि आपला व्यवसाय वाढवू शकतो. मात्र यासाठी आपण आपल्या पदार्थांची क्वॉलिटी कायम उत्तमच ठेवणे गरजेचे आहे. आपल्या गिर्‍हाईकांना आपल्याकडील नेमका कोणता पदार्थ आवडतो हे आपल्याला समजले पाहिजे. आपल्या गिऱ्हाईकाची नाडी अचूक ओळखता आली पाहिजे. आपल्या चेहऱ्यावर कायम हास्य असावे आणि आपण टापटीप असावं. आपल्या पदार्थाची एकदा टेस्ट तयार झाली की ती गिर्‍हाईकाच्या लक्षात राहते. हे सर्व अलिखित नियम केवळ फूड कॉर्नरसाठीच नाहीत तर इतर कोणत्याही व्यवसायासाठी आहेत.

ह्या वेळातच सूट परिधान केलेले एक तरुण व्यक्तिमत्व आमच्या समोर आले. " मी निर्भय करंदीकर " अशी त्यांनी आपली ओळख करून दिली. " मी तुम्हाला फॅक्टरीची सैर घडवून आणणार आहे," असे सांगून त्यांनी आमची दोन गटांत विभागणी केली. आणि पहिल्या गटाने त्या पाच मजली भव्य वास्तूत प्रवेश केला. सर्वात प्रथम त्यांनी सूचना केली की," संपूर्ण सहलीच्या दरम्यान तुम्ही फोटोग्राफीचा, व्हिडिओ शूटिंगचा मुक्तपणे आनंद घेऊ शकता." सहलीची सुरुवात तळघरातील स्टोअर रूम, गोडाऊन आणि मेन कोल्ड स्टोरेजपासून होते. मिठाईसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, उच्च दर्जाची साखर इत्यादी सर्व या गोडाउनमध्ये ठेवलेले आपल्याला दिसते. माल जसजसा तयार होतो तसतसा सेल्फ ए, बी, सी, डी, इ मध्ये क्रमाने रचून मग तो पॅकेजिंगला जातो हे पाहण्यास मिळाले. महत्त्वाचे म्हणजे कोल्ड स्टोरेज. ही कोल्ड स्टोरेजेस म्हणजे आपल्या फ्रिजइतकी नाहीत बरं !! तर -6°c हे एखाद्या बेडरूम एवढे आहे, यात ड्रायफ्रूट्स, भाज्या व इतर वस्तू ठेवल्या जातात. -10°c हे स्टोरेज तर एखाद्या फ्लॅटचा हॉल व बेडरूम मिळून जेवढी जागा होईल तेवढे मोठे आहे. या स्टोरेजमध्ये फक्त मावा, खवा एवढेच आहे. या स्टोरेजमध्ये शिरल्यावर तर काही मिनिटांसाठी स्वित्झर्लँडला जाऊन आल्यासारखं वाटलं. आणि तिसरे स्टोरेज.... अहो हे तर -35°c चे आहे !! हे अजून कार्यान्वित झालेले नाही. ही सर्व स्टोरेजेस खास जर्मनीहून आणलेली आहेत. यानंतर आपण परत तळमजल्यावर येतो. याठिकाणी भव्य असा शुद्ध पाण्यासाठी आरो प्लांट उभारला आहे. प्रशांत कॉलरची पाणीपुरी इतकी महाग का याचे उत्तर आम्हाला मिळाले. यानंतरची सैर तर केवळ अनाकलनीय होती. बाहेरून सामान्य दिसणाऱ्या पण आतमधून अतिशय सुसज्ज असणाऱ्या इमारतीत आमचा प्रवेश झाला. आणि समोरची दृश्य बघून अक्षरशः थक्क व्हायला झालं. पुढचा सर्व प्रवास केवळ अवर्णनीय होता. अत्यंत विलक्षण अशा दुनियेत आपण विहार करत आहोत असंच प्रत्येक क्षणी वाटत होतं. याचा प्रत्यक्ष अनुभव घेणंच जास्त बरोबर आहे. १९७८ च्या काळात, ठाण्यातल्या टेकडी बंगला परिसरातल्या कोपऱ्यात एक तरुण दररोजच्या उपजीविके करिता लागणाऱ्या वस्तूंच्या विक्रीचा छोटासा व्यवसाय करत होता. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी कशी पूर्ण करू अशा विचारांनी हिंमत न हारता त्या तरुणाने जिद्दीने वाटचाल सुरू ठेवली. त्याच जिद्द व प्रेमाच्या भक्कम पायावर स्वतःचा छोटा का होईना मिठाईचा व्यवसाय करावा या स्वप्नाचं मनोरथ अथक परिश्रमातून पूर्णत्वाला गेलं, यातूनच " प्रशांत कॉर्नर " या नावाचा जन्म झाला. आणि या ४०-४२ वर्षांच्या कालावधीत प्रशांत कॉर्नरच्या मिठाईची सहा आलिशान दुकाने ठाण्याच्या प्रमुख परिसरात उभी राहिली आणि ही पाच मजली सुसज्ज अत्याधुनिक फॅक्टरी कार्यान्वित झाली. हे सर्व मिठाईचे जग निर्माण करणारा एक अस्सल मराठी तरूण आहे. ज्यांचं नाव आहे श्री.प्रशांत सकपाळ. ***************** पारंपारिक मिठाई ते मॉडर्न जमान्यातील मिठाईतील असंख्य प्रकार गेल्या सोळा वर्षांपेक्षा अधिक काळापासून " प्रशांत कॉर्नर " आपल्याला देत आहे. सर्व प्रकारची मिठाई बनविण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचाच कच्चा माल वापरला जातो. फॅक्टरीमध्ये खास जर्मनीहून आणलेली कोल्ड स्टोरेजेस आहेत. ज्यांची क्षमता आहे , -6°c, -10°c, -35°c एवढी. प्रशांत कॉर्नर च्या सर्व दुकानांमधून राहिलेल्या मालाचा उपयोग कंपोस्ट खत तयार करण्याकरिता केला जातो. दररोज रात्री अकरा वाजता सर्व दुकानांतील राहिलेले पदार्थ या प्लांट मध्ये एकत्र केले जातात. व त्याचे कंपोस्ट खत तयार केले जाते. शुद्ध पाण्यासाठी ' आरो प्लांट ' बसविण्यात आला आहे. अत्यंत स्वच्छता संपूर्ण परिसरात व इमारतीत आहे. फॅक्टरीमध्ये 500 कामगार असून या कामगारांचा चहा- नाश्ता, दुपारचे जेवण, व संध्याकाळचा चहा फॅक्टरीमध्ये विनामूल्य मिळतो. स्वतः मालकही फॅक्टरीमध्येच कामगारांच्या बरोबर बसून आपला आहार घेतात. कामगारांच्या आरोग्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. दर सहा महिन्यांनी कामगारांच्या सर्व प्रकारच्या आरोग्य चाचण्या घेतल्या जातात. कंपनीची स्वतःची प्रयोगशाळा असून दररोज येणारा प्रत्येक कच्चा माल, जसे की दूध , पाणी इत्यादी सर्व वस्तू या प्रयोगशाळेत टेस्ट होऊनच पदार्थ तयार होण्यासाठी वापरले जातात. प्रत्येक मिठाईची प्रशांतसाहेब स्वतः टेस्ट घेऊन बघतात. मगच तो तयार झालेला माल पॅकिंगला जातो. ग्राहकांना हायजीनिक स्थितीतील पदार्थ, अस्सल चव, प्रमाणबद्धता, दर्जा, गुणवत्तेने अनुभवण्यास मिळतील हाच यामागचा उद्देश. संपूर्ण सैर झाल्यावर प्रशांत साहेबांनी आपल्या आतापर्यंतच्या प्रवासातील अनुभव, त्यांनी केलेली धडपड, आलेल्या अडचणी व त्या अडचणींवर केलेली मात या सर्व गोष्टींची माहिती आम्हाला सांगितली. मार्गदर्शनही केले. सुंदर पुष्पगुच्छ देऊन आपल्या संस्थेतर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले.आणि अत्यंत चविष्ट अशा अल्पोपहाराने आमची सहल संपन्न झाली. ' प्रशांत कॉर्नर ' तर्फे आम्हांला मिठाईचं बॉक्स भेट म्हणून देण्यात आलं. अशा प्रकारे या अत्यंत गोड सहलीची सांगता झाली. आम्ही काय शिकलो ? * स्वप्न पहावे * स्वप्न मोठी पाहावीत * पाहिलेल्या स्वप्नाचा पाठपुरावा करावा * अडचणींना घाबरुन न जाता त्यांना तोंड द्यावे * जिद्द बाळगावी * अपार परिश्रमांची तय्यारी ठेवावी * मनात सहिष्णुता बाळगावी * व्यवसाय प्रामाणिकपणे करावा * परिस्थितीनुसार वर्तणूक असावी * यश आपलेच आहे आपल्याला आवडतील त्या पदार्थांची खरेदी करून ही गोड शिदोरी घेऊन आम्हीं सर्व स्वयंसिद्धा घराच्या वाटेने निघालो. गोड आठवणी मनात ठेवूनच !! ही गोड सहल ज्यांनी घडवून आणली त्या आमच्या विजय सरांचे , आराधी मॕम , मेघना मॕम , मानसी मॕम ,दत्ता सर , भूषण सर या सर्वांचे मनःपूर्वक आभार !! देणाऱ्याने देत जावं , घेणाऱ्याने घेत जावं ...अशी आम्हां सर्वांची परिस्थिती झाली आहे . या सर्वांचं आयुष्य ' प्रशांत कॉर्नर 'च्या मिठाई प्रमाणे गोड रहावं अशीच ईश्वरचरणी प्रार्थना !!

धन्यवाद !!

अंजली नवलकर

Swayam Siddha
Author: Swayam Siddha

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]
Share Post

1 Comment

  1. Apratim Lekh aahe – Anjali madam

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *