गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया!!

       सण उत्सवांचा श्रावण सरला की वेध लागतात ते गणेश आगमनाचे. आम्हा कोकणवासियांमध्ये गणेशोत्सव म्हटला कि आनंदाला उधाण येते. प्रत्येक घराला रंग रंगोटी चा साज चढतो. नवे पडदे, तोरणे, झुंबरे या सर्वांनी घर नटते. अंगण शेणाच्या सारवणाच्या रंगात न्हाते. हिरव्यागार सारवणावर रंगीबेरंगी रांगोळीची दाटी होते. दारातील तुळशीवृंदावनातील तुळशीला बहर येतो. घरोघरी उत्साहाचे वातावरण संचारते. घर मुला नातवंडांनी भरभरून जाते आणि मनात हुरहुर सुरू होते ती म्हणजे गणेश आगमनाची. अनेक घरांमध्ये गणा धाव रे चे बोल, मृदुंगाची थाप, घुंगरांचा आवाज, नाचाचा सराव करणारी मुले असे दृश्य दिसू लागते. गणपती आणि बाल्या नाच हे एक वेगळेच समीकरण आहे.खरं तर मुंबईपासून सिंधुदुर्गा पर्यंत पसरलेल्या कोकणात या नाचाचे विविध प्रकार पहावयास मिळतात उदा. जाकडी नृत्य, टिपरी नृत्य, बाल्या नाच, दशावतार, नमन, खेळे आणि अजूनही काही प्रकार अनुभवास येतात. सुंदर गाण्याची रचना, उत्कृष्ट वादन, तालबद्ध नृत्य, त्यांचा पेहराव, गण-गवळण हे या वरील सर्व प्रकार यांची वैशिष्ट्ये आहेत.

       गणेशोत्सवाची सुरूवात होते ती म्हणजे भाद्रपद द्वितीयेला आवरणाच्या प्रथेने बहुदा सर्व घरातील लोकांना एकमेकाच्या घरातील अन्न चाखावयास मिळावे याकरिता ही प्रथा केलेली तेअसावी.या दिवशी वाडीतील प्रत्येक घरांमध्ये तांदळाची अथवा ज्वारीची भाकरी आणि रानभाज्या किंवा आपल्याच शेतात पिकवलेल्या पावटा, कडबा अथवा चणा यांच्या भाज्या करून आपापल्या परिस्थितीनुसार कोणी चतकोर, अर्धी, पूर्ण भाकरी व भाजी घरोघरी वाटतात. कमी तेल बहुतेक करून मसाला नाही असे असताना देखील या भाजी भाकरीची चव काही औरच असते. मुले तर हे सर्व वाटप करीत असताना रस्त्यातच भाजी-भाकरी फस्त करतात. कमालीचा उत्साह असतो त्यांच्यामध्ये.

     भाद्रपद तृतीयेला गावागावांमध्ये हरितालिकेचे पूजन कुमारीका मुली आणि महिला करतात. ही एक प्राचीन परंपरा आहे. पार्वती म्हणजेच हरिता आपल्या सखी बरोबर म्हणजेच आलि बरोबर शंकराच्या प्राप्तीसाठी  तपश्चर्या करते व शंकराला आपले बनवते.म्हणून या दिवशी पार्वती, तिची सखी व शंकराची चांगला पती मिळावा व लग्न झालेल्या महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे याकरिता ही उपासना करतात. या दिवशी या तिघांच्या प्रातिनिधिक मूर्ती स्थापित करून त्यांना सौभाग्याचे लेणे, विविध झाडांची पत्री असे अर्पण केले जाते व निर्जल उपवास केला जातो.

        आता भाद्रपद चतुर्थीचा दिवस हा उजाडताना आपल्याबरोबर एक आनंद उत्साह घेऊनच येतो. घरोघरी मुले, महिला, पुरुष पारंपारिक वेषात तयार होतात. गणेशशाळेतून घरोघरी छोट्या पाटावरून गणेशांचे आगमन होते व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. तत्पूर्वी बाप्पा ज्या ठिकाणी बसणार आहेत तेथे मापानुसार वरच्या बाजूला माटी म्हणजेच लाकडी चौकट जी वर्षानुवर्षे चालत आलेली असते तिला रंग रंगोटी करून व निसर्गातील पाना फुलांनी सुशोभित करून बांधली जाते. आज-काल तयार मकर आणि नवीन सजावटीच्या वस्तू उपलब्ध असल्या तरी पूर्वी स्व हस्ताने बांधलेले मखर, कागदी फुलांच्या माळा, पताका यांनी केलेल्या सजावट एक वेगळाच आनंद द्यायची. विशेष उत्साह असायचा तो मुलांमध्ये दूर्वा, पाने, फुले जमवण्याची लगबग तसेच बाप्पाची षोडपचारे पुजा झाल्यानंतर आरती चालू असताना जयदेव जयदेव असा मोठ्याने आवाज करण्याची धडपड, जास्त प्रसाद मिळवण्यासाठी चा प्रयत्न नंतर मोदकावर मारलेला यथेच्छ ताव एकूणच आनंदी आनंद असे! मुंबईवरून उत्सवासाठी आलेला चाकरमानी, गावातील गावकरी, शेजारी पाजारी सर्वांच्या उपस्थितीने उत्सवाचा आनंद द्विगुणित होतो.

        गणेश चतुर्थीला सुरू झालेला उत्सव पुढे पाच दिवस चालतो ज्यामध्ये भजन, किर्तन, नाच, दशावतार यांच्या डबल बारी ला उधाण येते. ऋषीपंचमीच्या दिवशी निसर्गातील भाज्यांचा उपयोग करून तेलाचा वापर न करता आणि इतर फोडणीचे साहित्य न वापरता केली जाणारी भाजी व सप्तऋषींची पूजा हे सगळेच एक आगळेवेगळे जग.

       मग येते ती म्हणजे ज्येष्ठा गौरी. पाण्याच्या ठिकाणी म्हणजेच नदी वरती पूजेचे साहित्य, गौरीची ओटी ठेवून सजल्या नटलेल्या महिला गौरीला मानाने घेऊन येण्याकरिता जातात. या दिवशी तेरड्याच्या झाडाला विशेष महत्त्व असते. कोणी दगड कोणी तेरड्याचे झाड कोणी मुखवटा तर कोणी कलशाचे पूजन करून गौरीला माहेरवाशिण म्हणून घरी आणतात. गणेशा सारखीच गौरीसाठी देखील छान आरास व सजावट केलेली असते. गौरी आगमनाच्या दिवशी तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसर्या दिवशी तिचे विधिवत पूजन केले जाते. तिला दागदागिन्यांनी मडवली जाते. नवी कोरी साडी नेसवली जाते.आणि पंचपक्वांनाच्या ताटाचा नैवेद्य करून तिला वाढला जातो. सोबतीला या माहेरवाशिणी ला भेट देण्यासाठी म्हणून लाडू,करंजी, मिठाई यांचादेखील घाट घातला जातो. गौरी जर पूर्व नक्षत्रात आल्या तर नववधूंचा  वंसा करण्याची सुद्धा एक चांगली प्रथा आहे. ज्यामध्ये सुपामध्ये सुकामेवा, फळे, पाने यांचा वंसा भरून त्यामध्ये निरंजन ठेवून अशाप्रकारे भरलेली सात सुपे एकावर एक ठेवून त्यांना दुधाचे सफलक घालून गौरी आणि गणपतीला ओवाळले जाते. या दिवशी नववधूचा नखरा वाखाणण्याजोगा असतो आणि कमाई देखील भरपूर असते. माहेरवाशिणी ला रात्रभर झिम्मा फुगड्या यासारखे खेळ करून जागवले जाते.

      आणि मग येतो तो म्हणजे गौरी-गणपतीचा विसर्जनाचा दिवस. एका बाजूला विसर्जनासाठी लागणाऱ्या प्रसादाची तयारी व इतर साहित्याची जुळवाजुळव यासाठी घरातील स्त्रिया यांची लगबग त्याच बरोबर माहेरवाशिण आणि गणेश आपापल्या घरी जाणार म्हणून डोळ्यातुन ओघळणारे पाणी असेच वातावरण घराघरातून दिसून येते.मृदुंगाच्या तालावर टाळ वाजवत भजन गात गौरीगणपती विसर्जनासाठी नदी वरती घेऊन जातात.आरती करून सर्वांनी आणलेला वेगवेगळा प्रसाद ज्यामध्ये दहीभात, फळे,मोदक एकत्र करून त्याचा काला केला जातो व प्रसाद म्हणून आलेल्या सर्वांना वाटला जातो. या प्रसादाची चव तर अवर्णनीय असते.गणपतीच्या विसर्जनानंतर नदीतील माती पाटावरती घेऊन घरी परतत असताना प्रत्येकाचे डोळे अश्रुनी भरलेले असतात. घर सुने सुने होते. पण पुन्हा एकदा पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत प्रत्येकाचे नवीन आयुष्य सुरू होते.

गणपती बाप्पा मोरया !
पुढच्या वर्षी लवकर या !
गणपती गेले गावाला
चैन पडेना आम्हाला !

–  रेखा नरेंद्र शिर्के

swayamprerit
Author: swayamprerit

A platform for marathi women

Click to rate this post!
[Total: 4 Average: 2]
Share Post

1 Comment

  1. सुरेख वर्णन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *